पान मसाल्याच्या दुकानात डल्ला मारणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात ; चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त

जुलै 24, 2026 4:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा रामानंद नगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

dct

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री पिंप्राळा येथील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख ५ हजार रुपये, असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

या प्रकरणी दुकानमालक सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत सापळा रचण्यात आला. या कारवाईत सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान दोघांनीही घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून फिर्यादीच्या तक्रारीतील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी आणि पोशी सागर नन्नवरे यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now