शिबिरात 29 जुलैपर्यंत विविध आरोग्य सेवा उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांच्या हस्ते दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिबीराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या रुग्णांसह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे महाआरोग्य शिबिर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका रुग्णालयांमध्ये 22 ते 29 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शुभारंभानंतर शिबिराच्या आयोजनाची माहिती देताना अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. रुग्णांचे आजाराचे अचूक निदान आणि तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय शिबिरात रक्तदान शिबिर, स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, अस्थीव्यंग निदान, डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्थूलता व उच्च रक्तदाब तपासणी, हर्निया, थॅलेसेमिया, मधुमेह तसेच कृत्रिम अवयव व पुनर्वसनासंदर्भातील तपासणी, मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोजकांन मार्फत करण्यात आले.








