जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेने पंढरपूरला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ‘उधना–मिरज–उधना’ ही विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे ही गाडी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या महत्त्वाच्या स्थानकांवरून धावणार आहे. यामुळे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. या विशेष सेवेमुळे वारकऱ्यांचा आषाढी वारीचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०७१ उधना–मिरज विशेष २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ६.४५ वाजता उधना येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल आणि पुढे सकाळी ७.३० वाजता मिरज येथे दाखल होईल.
तर गाडी क्रमांक ०९०७२ मिरज–उधना विशेष २४ आणि २५ जुलै रोजी सकाळी ८.४० वाजता मिरज येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५० वाजता उधना येथे पोहोचेल.
या महत्वाच्या स्थानकावर असेल थांबा?
या विशेष गाडीला चलथान, बारडोली, व्यारा, उकई सोनगड, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर आणि मिरज या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन या विशेष रेल्वेगाडीत एकूण १८ डबे जोडण्यात आले आहेत. त्यामध्ये १२ सामान्य (जनरल), ५ शयनयान (स्लीपर) आणि १ गार्ड डबा असणार आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या तसेच विनाआरक्षण प्रवाशांनाही या विशेष सेवेचा लाभ घेता येणार असून, आषाढी वारीचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.








