जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आज बुधवारी (२२ जुलै) सकाळी अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करत सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख योगदानाचा गौरव केला. यावेळी वक्त्यांनी स्व. अजितदादा पवार यांचे विचार, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि विकासाचा दृष्टिकोन प्रत्येक घराघरात व गावागावात पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, शहर कार्याध्यक्ष कदीर खान, युवा नेते ॲड. देवकांत पाटील, ग्रामीण कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष तथा पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन विनोद पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, तालुका सरचिटणीस प्रा. अर्जुन पाटील, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, माजी उपसरपंच समाधान पाटील (नावरे), अशोक पाटील, अक्षय बोरवले, मोहसीन खान, प्रदीपसिंग राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाला.












