जळगाव जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी; ‘या’ तारखेपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज?

जुलै 22, 2026 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२६ । गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर राज्यासह जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने दुरावलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

rain 1

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. मात्र यांनतर पाऊस गायब झाल्यामुळे खरिपाची पिके सुकू लागली होती. कापूस, मका आणि सोयाबीन यांसारख्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. याचदरम्यान, काल झालेल्या पावसाने पिकांना थेट जीवनदान मिळाले आहे.

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. या वाऱ्यांमुळे वातावरणातील हवा वर सरकत असून वेगाने ढगांची निर्मिती होत आहे. तसेच सैल हवेचा पट्टा अधिक मजबूत झाल्याने जळगाव जिल्ह्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात मोठी घट झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र आहे.

२४ जुलैपर्यंत पावसाची शक्यता

तसेच २२ ते २४ जुलै दरम्यान जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढू शकतो तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now