जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाने सन २०२६ पासून स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीचा शासनमान्य कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश केला असून, त्यानुसार 22 जुलै 2026 रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रावेर लोकसभा जिल्ह्याच्या वतीने यावल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांची भेट घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांची आकर्षक प्रतिमा भेट देण्यात आली.

यावेळी शासनाच्या निर्णयाची माहिती देत, 22 जुलै रोजी तहसील कार्यालयासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करून शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात प्रशासन, विकासकामे, शेतकरी, युवक, शिक्षण, सहकार, ग्रामीण विकास आणि जनकल्याणासाठी दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील नव्या पिढीने घ्यावा तसेच लोकहिताच्या कार्याची प्रेरणा त्यांच्या विचारांतून मिळत राहावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रतिनिधी मंडळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, ॲड. देवकांतभाऊ पाटील, शहर कार्याध्यक्ष कादिरभाई खान आणि विद्यार्थी शहराध्यक्ष प्रेमजी देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था तसेच सामाजिक संघटनांनी 22 जुलै रोजी स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांची जयंती उत्साहात साजरी करून त्यांच्या कार्याला अभिवादन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.












