मध्य प्रदेशातील ‘उमर्टी’वर जळगाव पोलिसांचे थरारक कॉम्बिंग ऑपरेशन! १२ संशयित ताब्यात, देशी कट्टे व ३२ दुचाकी जप्त

जुलै 21, 2026 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२६ । अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीच्या वाढत्या नेटवर्कवर आळा घालण्यासाठी जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील गुन्हेगारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या उमरटी (ता. वरला) गावात भल्या पहाटे संयुक्तरित्या मोठे सर्च ऑपरेशन राबवले.या कारवाईत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य तसेच ३२ संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धडक ‘सर्च ऑपरेशन’मुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

umarti2

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही रणनीती आखली होती. आज पहाटे २ च्या सुमारास, जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होते, तेव्हा जळगावसह धुळे, नाशिक पोलिसांच्या ताफ्याने उमर्टी गावाला सर्व बाजूंनी घेरले. हे भव्य आणि धाडसी ऑपरेशन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्वतः मैदानात उतरून लीड (नेतृत्व) केले.

चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०३/२०१६, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २२/२०२५ तसेच नाशिक ग्रामीणमधील पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १७५/२०२६ या अवैध शस्त्रसाठा आणि शस्त्र अधिनियमाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली.

मोहीमेदरम्यान पोलिसांनी ४५ संशयित घरांची कसून झडती घेतली. सुमारे २० संशयितांची चौकशी करण्यात आली, तर १२ जणांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संबंधित दोन संशयितांच्या अंगझडतीत दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

कारवाईदरम्यान ३२ निनावी व महाराष्ट्र नोंदणीच्या संशयित मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याशिवाय देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, विविध धातूचे साचे आणि इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले. फरार असलेल्या २७ आरोपींच्या घरांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिओ-टॅगिंग करण्यात आले असून त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या संयुक्त कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, विविध उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते.

मोहीमेसाठी जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, ३५ दुय्यम पोलीस अधिकारी आणि २४० पोलीस कर्मचारी सहभागी झाले. त्याचबरोबर नाशिक व धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी सुमारे ७० पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. एकूण ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २० शासकीय वाहनांच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वी केली. अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीविरोधात भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now