जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात प्रतिक्विंटल ३ हजार ते ३१०० रुपयांपर्यंत पोहोचलेले केळीचे दर अवघ्या चार दिवसांतच कोसळले असून प्रतिक्विंटल तब्बल १ हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. एकीकडे बाजारात केळीची आवक वाढत असतानाच दुसरीकडे अचानक दर कमी झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

सध्या ‘इतका’ मिळतोय भाव?
सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या (सुपर) केळीला प्रतिक्विंटल सुमारे २३०० रुपये दर मिळत आहे. तर मध्यम व सर्वसाधारण दर्जाच्या केळीचा भाव १५०० ते १७०० रुपये इतक्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी मिळणाऱ्या दराच्या तुलनेत ही मोठी घसरण असल्याने उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

उत्पादन खर्च वाढला, दर मात्र घसरले
यंदा अवकाळी वादळ, त्यानंतरचा उष्णतेचा तडाखा आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे केळी उत्पादक आधीच अडचणीत आहेत. खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने उत्पादनाचा खर्च वाढला आहे. अशातच बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम केळीच्या निर्यातीवर होत आहे. विशेषतः इराण-अमेरिका तणावामुळे निर्यात प्रक्रियेला फटका बसल्याने देशांतर्गत बाजारात केळीची आवक वाढली आहे. पुरवठा वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
श्रावण महिन्याकडून आशेचा किरण
२८ जुलैनंतर उत्तर भारतात श्रावण महिन्याची सुरुवात होणार असून या काळात उपवास, धार्मिक कार्यक्रम आणि सणांमुळे केळीच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे आगामी काही दिवसांत बाजारभावात सुधारणा होईल आणि सध्याच्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई होईल, अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.










