जळगाव जिल्ह्यातील पावसाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज; बळीराजाची चिंता वाढली, वाचा काय आहे?

जुलै 17, 2026 11:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२६ । जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यातून पूर्णपणे काढता पाय घेतला आहे. अचानक गायब झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा चिंतेत पडला आहे. पाऊस न झाल्याने खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसून अनेक भागांतील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.

rain farmer

खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती सतावू लागली असून शेतीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

३० जुलैपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता धूसर

हवामान अभ्यासकांच्या मते, सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होताना दिसत नाही. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता अत्यल्प असल्याने उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची अपेक्षा करता येणार नाही. केवळ वातावरणातील आर्द्रतेमुळे काही ठिकाणी हलक्या किंवा तुरळक सरी पडू शकतात. जळगाव जिल्ह्यातील पावसाचा मोठा भाग बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रावर अवलंबून असतो. सध्या तेथे हवामानातील काही हालचाली सुरू असल्या तरी त्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भापुरताच मर्यादित राहण्याची शक्यता असल्याने जळगावला त्याचा विशेष फायदा होण्याची चिन्हे नाहीत.

एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे तापमानात झालेली वाढ, यामुळे जळगावकरांना ऐन पावसाळ्यात असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे

दरम्यान, हवामान विभागाने आज जळगाव जिल्ह्यात तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, त्यातून शेतीला फारसा दिलासा मिळेल, अशी परिस्थिती नाही. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वारंवार काळे ढग दाटून येत आहेत. मात्र, पावसाच्या सरी कोसळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आता बळीराजा डोळे लावून बसला असून, येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now