जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणारा प्रमुख मार्ग आता आधुनिक एलईडी पथदिव्यांनी उजळणार आहे. या मार्गावर एलईडी पथदिवे उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक योजनेतून ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या या निधीतून अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होणार असून वाहनचालक, पादचारी तसेच विमानतळाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकल्पासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. या प्रस्तावाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन यांचेही विशेष सहकार्य लाभल्याने निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आगामी काळातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दर्जेदार मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य देणार आहे.”












