रेल्वे तिकीट कॅन्सलेशनचे नियम बदलले; ‘या’ वेळेनंतर १ रुपयाही रिफंड मिळणार नाही, वाचा नवे नियम?..

जुलै 15, 2026 2:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या देशभरातील कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वेने आरक्षित (Reserved) तिकीट रद्द करणे आणि त्याचा परतावा (Refund) मिळण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमांनुसार, आता प्रवाशांनी तिकीट कधी रद्द केले यावर रिफंडची रक्कम ठरणार असून, निष्काळजीपणा केल्यास प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

train ticket

काय आहेत नवे नियम?

रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्यापूर्वी ७२ तासांपेक्षा अधिक वेळ असताना तिकीट रद्द केल्यास सर्वाधिक रिफंड मिळणार आहे. ७२ ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास भाड्याच्या २५ टक्के रकमेची कपात होईल. तर २४ ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम वजा केली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ट्रेन सुटण्यास ८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड मिळणार नाही.

काउंटर तिकीट रद्द करणे झाले सोपे

प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा देत रेल्वेने काउंटरवरून घेतलेले आरक्षित तिकीट आता देशातील कोणत्याही रेल्वे आरक्षण केंद्रावरून रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी तिकीट ज्या स्थानकावरून काढले होते, त्याच ठिकाणी जाऊन रद्द करावे लागत होते. या बदलामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.

बोर्डिंग स्टेशनही बदलता येणार

नवीन नियमानुसार, प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकणार आहेत. पूर्वी ही सुविधा आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वीच उपलब्ध होती. त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवासाच्या नियोजनात बदल झाल्यास प्रवाशांना अधिक लवचिकता मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना या नव्या नियमांची माहिती करून घेण्याचे आवाहन केले आहे. वेळेत तिकीट रद्द केल्यास अनावश्यक आर्थिक नुकसान टाळता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now