नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकचे अनोखे आंदोलन

जुलै 14, 2026 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी नगरपरिषद कार्यालयात अनोखे आंदोलन केले. नगराध्यक्षांची प्रत्यक्ष भेट न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील खुर्चीलाच निवेदन चिकटवत निषेध नोंदविला. या आंदोलनातून अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील गटाराच्या कामांची मागणी करण्यात आली.

amlcnp

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश (डी.पी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी नगराध्यक्षांकडून वारंवार वेळ न मिळाल्याने नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहत असल्याची नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनादरम्यान नगरपरिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शहरातील अमरधाम (स्मशानभूमी) येथे अत्याधुनिक सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित वाहनतळ, शोकसभागृह, एलईडी दिवे, पंखे, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, काँक्रीट पार्किंग, कायमस्वरूपी पाणीपुरवठा, वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, हिरवळ आणि साउंड सिस्टीम अशा विविध सुविधांची मागणी करण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासोबत आवश्यक गटारांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. पावसाचे व सांडपाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी काही विशिष्ट भागांमध्ये गटारी उभारण्याची आवश्यकता आंदोलनकर्त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी दुर्गेश पाटील यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण (गुड्डू) देशमुख, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now