जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२६ । ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. विभागीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते १८ जुलैदरम्यान जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) महत्त्वाची बैठक पार पडणार असून, यामध्ये या निधीबाबत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

३००० रुपये मिळण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, १८ जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर जुलै महिन्याच्या अखेरीस जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मानधन १५०० वरून २१०० रुपये होणार?
सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, वाढती महागाई लक्षात घेता, केंद्र सरकारच्या एका समितीने ही रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे. राज्य सरकारही या शिफारशीवर सकारात्मक विचार करत असून, लवकरच ही रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणाला मिळणार लाभ?
योजनेचा लाभ फक्त अशाच महिलांना मिळणार आहे ज्यांनी ३० एप्रिलपूर्वी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली आहे आणि योजनेच्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली आहे. त्यांनाच लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत, पेन्शनधारक किंवा करदाता असल्यास त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.












