जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदार आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहू नये, अशी भूमिका जळगाव भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. खडसे यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्यास जिल्ह्यात चुकीचा राजकीय संदेश जाईल आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी भीती स्थानिक नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नेत्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतली. मात्र, खडसे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांचे स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे.
“मला भाजपमध्ये प्रवेश करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे. माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील, पण मी जाणार नाही,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे हे एकेकाळी महाराष्ट्र भाजपमधील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. राज्यात भाजपचा विस्तार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, जमीन व्यवहारासह विविध आरोपांनंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पक्षातील त्यांचे राजकीय वजन कमी होत गेले. अखेर २०२० मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.







