जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२६ । गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र मागच्या काही दिवसापासून राज्यात मान्सूनने विश्रांती घेतल्याचे चित्र असून, जळगावात पुढील तीन दिवस नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव, अफगाणिस्तानातून येणारे कोरडे वारे आणि मान्सून ट्रफची प्रतिकूल स्थिती यामुळे उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

सोमवारी जळगाव शहर व जिल्ह्यात हवेतील आर्द्रता तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने दिवसभर प्रचंड उकाडा जाणवला. हवामान अभ्यासकांच्या विश्लेषणानुसार, पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाढलेल्या आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून नागरिक घामाघूम होण्याची शक्यता आहे.

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात तयार झालेला एल निनो अधिक प्रभावशाली होत आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून भारताकडे वाहणारे कोरडे वारे मान्सूनला अडथळा ठरत आहेत. परिणामी आज मंगळवारपासून पुढील रविवार-सोमवारपर्यंत राज्यात बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र त्यातून कोणताही मोठा दिलासा मिळणार नाही.
जळगाव जिल्ह्यातही पुढील चार दिवस पावसात फारशी सुधारणा अपेक्षित नसून, केवळ हलका ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्व भारतातील कमी दाबाचा पट्टा मजबूत होत असल्याने उत्तर महाराष्ट्रात ओलसर वाऱ्यांचा प्रवाह वाढून ढग जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र, त्याचा परिणाम तातडीने पावसाच्या स्वरूपात होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हवामानातील परिस्थिती अनुकूल राहिल्यास २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याचा नेमका प्रभाव आगामी हवामान बदलावर अवलंबून असणार आहे. तोपर्यंत जळगावकरांना उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.







