२०१९ चा पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या कल्पनेनेच; आमदार अनिल पाटलांचा मोठा गौप्यस्फोट!

जुलै 13, 2026 5:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत(एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच, आता अमळनेरचे अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. २०१९ मधील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा बहुचर्चित ‘पहाटेचा शपथविधी’ शरद पवार यांच्या पूर्ण कल्पनेनेच झाला होता, असा थेट दावा अनिल पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

anilpatil

शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर महाविकास आघाडीत (विशेषतः ठाकरे गटात) निर्माण झालेली नाराजी या पार्श्वभूमीवर अनिल पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अनेक जुने संदर्भ उघड केले.

2014 मध्ये शरद पवार यांनी भाजपला समर्थन दिले होते, मात्र ते काही दिवसांमध्ये मागे घेतले. 2017 मध्ये शिवसेनेला बाजूला करून भाजपसोबत सत्तेत जाण्याची चर्चा झाली होती, मात्र शेवटच्या क्षणी ती थांबली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीची सर्व कल्पना शरद पवार यांना होती, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःला बाजूला केले. 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या एक महिना अगोदर आम्हीही सत्तेत जाणार होतो, याचीही कल्पना कदाचित शरद पवार यांना होती, मात्र त्यावेळी तो निर्णय थांबला. असा गौप्यस्फोट अनिल पाटील यांनी केला आहे.

यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘लाडकी बहीण’ योजनेवरही भाष्य केले. विरोधकांकडून या योजनेबाबत जाणीवपूर्वक संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अनिल पाटील यांच्या या दाव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories