जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाळ्याच्या दिवसांत धान्य वाहतूक आणि साठवणुकीत निर्माण होणारे संभाव्य अडथळे लक्षात घेऊन राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल २८ लाख ६ हजार ८१० लाभार्थ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या तीन महिन्यांचा रेशन धान्यसाठा आगाऊ (अॅडव्हान्स) दिला जाणार आहे.जिल्ह्यातील ६ लाख ७१ हजार ७५८ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ३१ ऑगस्टपर्यंत हा तीन महिन्यांचा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

हा लाभ प्रामुख्याने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील शिधापत्रिकाधारकांना दिला जाणार आहे. तीन महिन्यांचे धान्य जरी एकत्र किंवा आगाऊ वितरित केले जाणार असले, तरी तांत्रिक गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याचे व्यवहार आणि ई-पॉस मशीनवरील बायोमेट्रिक प्रमाणीकरण मात्र स्वतंत्रपणेच केले जाणार आहे.

काही जिल्ह्यांमध्ये वाहतूक कंत्राटदारांकडून अद्यापही पुरेशी वाहने उपलब्ध करून दिली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने, संबंधित कंत्राटदारांना तातडीने आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांच्या कमतरतेमुळे धान्य उचलण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.
दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार तीन महिन्यांचा साठा ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. गेल्या तीन महिन्यातील साठा वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याने सध्यातरी ‘आगाऊ’ वाटपासाठीचे थान्य साठवल्यास अडचणी निर्माण होतील. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून धान्य साठ्याची मागणी नोंदवून उपलब्धतेनुसार वाटप सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने तालुकानिहाय स्थितीचा आढावा घेऊन नियोजन निश्चित केले आहे.








