जळगाव लाईव्ह न्यूज । खान्देश इनक्युबेशन, टेक्नॉलॉजी अँड आंत्रप्रेन्योरशिप (KITE) फोरमचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काईट फोरमच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील स्टार्टअप फाऊंडर्स आणि को-फाऊंडर्सचा विशेष सत्कार करण्यात आला.

काईटच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सुगोकी ग्रुपचे संचालक धनराज कासट उपस्थित होते. व्यासपीठावर चेअरमन डॉ. शांताराम बडगुजर, संचालक डॉ. युवराज परदेशी आणि सीईओ सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सागर पाटील यांनी काईटच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा मांडला. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात काईटने ३ स्टार्टअप लाँचपॅड आयोजित केले असून ४ महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार केले आहेत. तसेच आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील २४ स्टार्टअप फाऊंडर्स व को-फाऊंडर्सना थेट मार्गदर्शन केले आहे.
डॉ. शांताराम बडगुजर यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील नवउद्योजकांना पुढे आणण्यासाठी काईट कशाप्रकारे काम करत आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते धनराज कासट यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी चांगल्या कल्पनेसोबतच प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. आज आपल्या भागात तरुणांसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत, फक्त योग्य संधी ओळखण्याचे कौशल्य त्यांनी स्वतःमध्ये विकसित केले पाहिजे. काईटच्या मार्गदर्शनामुळे नवीन उद्योजकांची पुढील वाटचाल नक्कीच सोपी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी सुगोकी ग्रुपच्या प्रवासातील अनुभव आणि अडचणींवर कशी मात केली, हे उदाहरणांसह सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. के. बी. पाटील यांनी नमूद केले की, ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठी क्षमता आणि कौशल्य आहे. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी ते मागे पडतात. अशा परिस्थितीत काईट फोरम नवउद्योजकांसाठी एक उत्तम दिशादर्शक ठरेल. या सोहळ्यात निलेश शेटे, आरती शेटे, प्रसाद नेवे, जगदीश माळी, गोपाळ माळी आणि सिद्धेश रणधीर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. युवराज परदेशी यांनी केले.
या प्रसंगी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू दिलीप हुंडीवाले, प्रा. डॉ. भूषण चौधरी, प्रा. डॉ. विकास गीते, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे, सॅटरडे क्लबचे सचिन दुनाखे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश भोसले, कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा.लि.चे संचालक तुषार भांबरे, विराज फोटोग्राफीचे प्रकाश मुळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.









