दमदार पुनरागमनंतर जळगाव जिल्ह्यात मान्सूनला ‘ब्रेक’? वाचा हवामान विभागाचा चिंताजनक अंदाज..

जुलै 10, 2026 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२६ । जून महिनाभर मान्सूनच्या लांबलेल्या प्रतीक्षेमुळे चिंतेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, हा आनंद अगदीच अल्पजीवी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाने शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढलीय.

farmer Dry spell

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २० जुलैपर्यंत जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कमी असून परिणामी पावसाचा ‘ड्राय स्पेल’ म्हणजेच पावसातील खंड कायम राहू शकतो. यामुळे नुकत्याच पेरण्या आटोपलेल्या बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

जिल्ह्यात बहुतांश भागांत १८ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेल्यानंतर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरत कापूस, सोयाबीन, मका आणि उडीद-मुगाच्या पेरण्या वेगाने पूर्ण केल्या. आता कुठे जमिनीत कोवळी अंकुरे डोकवू लागली असतानाच पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. पिकांच्या जोमदार वाढीसाठी या काळात जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, उघडिपीमुळे पिके सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याकडून या दोन्ही दिवसांसाठी जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हवामान खात्याचा हा अंदाज फोल ठरला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होऊन जमिनीतील ओलावा कमी होण्याची शक्यता आहे.

‘ड्राय स्पेल’ची कारणे काय?

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पाकिस्तान, अफगाणिस्तानातून अर्थात भारताच्या वायव्येकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा जोर आगामी काळात वाढणार आहे. या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता कमी होईल, त्यामुळे अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची निर्मिती कमी होणार आहे.

यामुळे पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यातच आता एल निनोचा प्रभाव अधिक वाढणार आहे, त्याचा परिणाम भारतात दाखल झालेल्या सक्रिय मान्सूनवर होणार आहे. जोपर्यंत बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत नाही, तोपर्यंत पावसाची कोणतीही आशा नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकरी बारकाईने लक्ष ठेवून असून, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now