जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदी पुलावर आज गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या एका कारला पुलावरच अचानक भीषण आग लागली. धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे पुलावरील इतर प्रवासी आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

प्राथमिक माहितीनुसार, या स्विफ्ट डिझायर कारमध्ये अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. कार पुलावरून जात असतानाच या बिघाडामुळे गाडीतून धूर निघू लागला आणि काही वेळातच कारने मोठा पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने गाडीबाहेर पळ काढल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे समजते.

भर पुलावर कारने पेट घेतल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे विदगाव पुलावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती आणि वाहतूक पूर्णपणे कोंडली गेली. जळगावकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पुलावर लागल्या होत्या.








