जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घराच्या आवारात खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी घडली. आकांक्षा प्रवीण इंगळे असं मयत चिमुरडीचे नाव असून अवघ्या चार दिवसांपूर्वीच जिचा तिसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता, त्या चिमुरडीच्या जाण्याने संपूर्ण नशिराबाद परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास घरातील सर्व सदस्य जेवण करत होते. त्यावेळी आकांक्षा घराच्या आवारात खेळत होती. खेळण्याच्या नादात ती नकळत पाण्याच्या हौदात पडली. काही वेळानंतर ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती हौदात आढळून आली.

कुटुंबीयांनी तातडीने तिला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाच्या आनंदानंतर अवघ्या काही दिवसांतच तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.







