रस्ते अपघात रोखण्यासाठी जळगावात अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण; ‘या’ त्रुटींवर झाली सविस्तर चर्चा

जुलै 4, 2026 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ‘शुन्य मृत्यु जिल्हा'(झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट) अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ते अपघातांची कारणे, अभियांत्रिकी त्रुटी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

prashikshan

पुणे येथील सेव्हलाईफ फाउंडेशनचे तज्ज्ञ निलेश साळुंखे आणि विवेक भुसे यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. रस्त्यांवरील साईड पट्ट्यांचा अभाव, रंबल स्ट्रिप्स व दिशादर्शक फलकांची कमतरता, साईड व मध्यरेषा नसणे, अपुरी प्रकाशयोजना, अरुंद पार्किंग व्यवस्था तसेच रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीतील त्रुटी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणे, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती अभियान राबविण्याची आवश्यकता असल्यावरही त्यांनी भर दिला. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय व महाविद्यालय स्तरावरील शिक्षक, प्राध्यापक यांना हेल्मेट वापर करून नवीन आदर्श निर्माण करता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेच्यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते सुविधेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी.पाटील यांचेसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now