जळगावातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मृग बहार फळपिक विमा योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा?

जुलै 3, 2026 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत ‘पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना’ सन २०२६-२७ च्या मृग बहार हंगामासाठी जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

Mrig Bahar fruit crop insurance

या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी चिकू, डाळिंब, पेरू, मोसंबी, लिंबू, सिताफळ, संत्रा या फळपिकांसह हळद या मसाला पिकाचा समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. विविध हवामान जोखमींमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेत कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, अवेळी पाऊस तसेच जास्त तापमान यांसारख्या हवामान घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे.

या योजनेत सहभागी होणे कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका पिकासाठी एका वर्षात मृग किंवा अंबिया बहार या दोन्हीपैकी केवळ एका हंगामासाठी विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. योजनेत सहभागी होऊ इच्छित नसलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित शेतकरी योजनेत सहभागी असल्याचे गृहित धरून विमा हप्ता कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

मृग बहार २०२६-२७ साठी लिंबू, पेरू, मोसंबी, चिकू, डाळिंब, संत्रा आणि हळद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२६, तर सिताफळासाठी ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ई-पिक पाहणी व Agristack नोंदणी पूर्ण करून विहित मुदतीत विमा अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कुरबान तडवी यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now