जळगाव एलसीबीची धडक कारवाई; १५७५ किलो गोवंश मांस जप्त, ११ जण ताब्यात, ६ फरार

जुलै 3, 2026 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ जुलै २०२६ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पहाटेच्या सुमारास राबविलेल्या नियोजनबद्ध आणि अत्यंत गोपनीय कारवाईत शहरातील कथित बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. पारधीवाडा आणि जपान जिन परिसरातील दोन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत पोलिसांनी १,५७५ किलो गोवंश मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व साहित्य जप्त केले. तसेच तीन जिवंत गावरान बैलांची सुटका करण्यात आली असून या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहा संशयित आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

kattal

एलसीबीच्या पथकाने आज सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विशेष सर्च ऑपरेशन राबवत दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईमुळे अवैध कत्तल व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कारवाईदरम्यान पोलिसांनी हसनखान गुलाबखान पठाण, मोहसीनखान हसनखान पठाण, फराजखान हमीदखान कुरेशी, अर्षदखान अजीजखान कुरेशी, रियाज अहमद अब्दुल शकूर कुरेशी, तन्वीर शेख ताहेर कुरेशी, जावेदखान सुलेमानखान कुरेशी, अब्दुल शेख नुरा कुरेशी, अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी आणि शरीफ शेख अकबर कुरेशी यांना ताब्यात घेतले. तर इकबाल शेख, जहांगीर शेख, आरीफ अजीज कुरेशी, जाबीर खान, जहीरखान आणि शरीफ खान हे सहा संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे १,५७५ किलो गोवंश मांस जप्त केले. तसेच ४ लोखंडी कुऱ्हाडी, ९ लोखंडी सुऱ्या, ६ लोखंडी कोयते आणि २ वजनकाटे जप्त करण्यात आले. या साहित्याची किंमत सुमारे ३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय जपान जिन परिसरातील पत्र्याच्या शेडमधून १२ ते १६ वर्षे वयोगटातील तीन पांढऱ्या रंगाचे गावरान बैल सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे. अशाप्रकारे जप्त मुद्देमाल व जनावरे मिळून ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत. एलसीबीच्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तलीच्या व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now