जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२६ । १ जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. मात्र, दुसरीकडे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल न केल्यामुळे गृहिणींच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरची किंमत 2,930 रुपये असेल. ही किंमत आधीच्या 3,113.50 रुपयांच्या तुलनेत कमी असून, यामुळे ग्राहकांना 183.50 रुपयांचा दिलासा मिळाला आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,580.50 होती. जानेवारीत 2026 मध्ये त्यात वाढ होऊन 1,691.50 झाली. सतत सिलेंडरच्या किमतीत वाढ होऊ 3 हजाराच्या आसपास व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती पोहोचल्या. आता कुठे दिलासा मिळाला.

६ महिन्यांत किंमती झाल्या होत्या दुप्पट
गेल्या ६ महिन्यांत आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लादलेल्या निर्बंधांमुळे भारताला मोठ्या एलपीजी संकटाचा सामना करावा लागला होता. यामुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन जानेवारी ते जून दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या होत्या. जानेवारी २०२६ मध्ये ₹१,६९१.५० असलेला व्यावसायिक सिलेंडर जूनपर्यंत थेट ₹३,११३.५० वर पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर आज झालेली घट व्यावसायिकांना काहीशी दिलासा देणारी आहे.
घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही
एकीकडे व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाले असताना, घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. जानेवारी ते जून दरम्यान घरगुती सिलेंडरच्या दरात ₹८९ ची वाढ झाली होती. १ जुलैला या वाढीव दरात कपात होण्याची अपेक्षा वर्तवली जात होती, परंतु तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे ठेवले आहेत.
व्यावसायिक सिलेंडरवरील निर्बंध हटवले
दरम्यान, केंद्र सरकारने गैर-घरगुती पॅकेज्ड एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावरील सर्व निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न समारंभांच्या ठिकाणी गॅस सिलिंडरची उपलब्धता अत्यंत सुलभ होणार आहे.











