महाडमध्ये २८ जून रोजी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन

जून 23, 2026 2:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व ‘सामाजिक न्याय’ दिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे एक दिवसीय ‘राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. विवेक विचार मंच व सहयोगी संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते.

samajik nyay parishad

महाराष्ट्र शासनाने सन २०२६-२७ हे वर्ष “सामाजिक समता समरसता वर्ष” म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वर्ष संत रविदास महाराज यांचे ६५० वे जयंतीवर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांचे २०० वे जयंतीवर्ष, संत गाडगे महाराज यांचे १५० वे जयंतीवर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळ सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष असल्याने या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाची परिषद महाड येथे होत आहे.

या परिषदेला केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार व संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजु, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, नगर विकास आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, बार्टीच्या प्रभारी महासंचालक दीपा मुधोळ मुंडे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (लोणेरे) कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेसाठी राज्यभरातून सामाजिक संस्थांचे सुमारे १० हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दिवसभरात एकूण तीन प्रमुख सत्रे होतील. पहिल्या सत्रात उद्घाटन व पुरस्कार वितरण होईल. दुसरे सत्र हे ‘संवाद सत्र’ असेल, ज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील समस्या, सामाजिक न्याय, समता आणि शासकीय योजनांवर चार गटांत चर्चा होईल. तर तिसऱ्या व अंतिम सत्रात सामाजिक विषयांवर ठराव पारित केले जातील.

‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६’ जाहीर

सामाजिक न्याय व समतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ११ संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना या परिषदेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींची विभागवार नावे खालीलप्रमाणे आहेत.

पश्चिम महाराष्ट्र विभाग: ॲड. विजय लक्ष्मण गव्हाळे (बारामती), श्री. मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी चिंचवड).
मराठवाडा – खान्देश विभाग: श्री. नागेश मोहन कंडारे (धुळे), प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर), श्री. नागसेन शामराव पुंडगे (परभणी), डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड).
विदर्भ विभाग: श्री. प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर), श्री. शाम वसंत माळवंदे (खामगाव, बुलढाणा).
कोकण विभाग: श्रीमती स्मिता सुशांत कवाडे (मुंबई), श्री. विजय अंबुजी जाधव (अंधेरी, मुंबई), श्री. महादेव कृष्णाजी गोठणकर (राजापूर, रत्नागिरी).

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now