खान्देशात मान्सूनचा ‘खो’; जून अर्धा संपला तरी तब्बल ७०% पावसाची तूट, शेतकरी चिंतेत!

जून 20, 2026 9:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी खान्देशात अद्याप मान्सूनची दमदार सुरुवात झालेली नाही. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये १८ जूनपर्यंत सरासरी केवळ ७.०९ मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाची तब्बल ७०.४० टक्के तूट असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण खान्देशात पेरण्या रखडल्या असून बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

rainfarmer

खान्देशातील धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ९१.७१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ जूनपर्यंत अपेक्षित ७२.९ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ १.६ मिमी पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात ८९.३० टक्के तूट असून ९३.१ मिमी अपेक्षित पावसापैकी केवळ १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यात अपेक्षित १४३.२ मिमी पावसाच्या तुलनेत फक्त ९.६ मिमी पाऊस पडला असून येथे ७३.०६ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे.

का रेंगाळला पाऊस?

हवामान तज्ज्ञांच्या मते, खान्देशासह राज्यात मान्सून अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. मान्सूनला गती देणारी आणि पुढे ढकलणारी काही महत्त्वाची हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने त्याचा थेट परिणाम पावसावर झाला आहे. त्यामुळेच जूनच्या सुरुवातीपासून अपेक्षित असलेला जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही.

जूनअखेरीस दिलासा मिळण्याची शक्यता

पावसाअभावी सध्या शेतकरी चिंतेत असून अनेकांनी पेरण्या थांबवून ठेवल्या आहेत. मात्र, हवामान विभागाने एक आशेचा किरण दाखवला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांमुळे मान्सूनला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला खान्देशात चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या सर्वांचेच लक्ष हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे आणि आभाळाकडे लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now