जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लांबल्याने गिरणा धरणावरील अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीपात्रातील गावांना दिलासा देण्यासाठी आज, शनिवार (२० जून) रोजी गिरणा धरणातून शेवटचे बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे.

सध्या गिरणा धरणात २९.७४ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून धरणातून २००० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. या आवर्तनामुळे गिरणा नदीपात्रात सुमारे २० दिवसांपर्यंत पाणी उपलब्ध राहण्याची अपेक्षा जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी राज्यातील विविध प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेत पाण्याचा प्रत्येक थेंब प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तापी आणि गिरणा विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.
या बैठकीत आवर्तनादरम्यान पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे, जिल्ह्यातील अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शनिवारी सकाळी ६ वाजता गिरणा धरणातून शेवटचे आवर्तन सुरू करण्यात येणार आहे.
यापूर्वीही नदीपात्रातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन आवर्तन देण्यात आले होते. मात्र, पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने पुन्हा एकदा आवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीपात्रातील विहिरी आणि काठावरील पाणीपुरवठा योजना काही काळ सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, धरणातून सोडण्यात येणारे पाणी सिंचनासाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. नदीपात्रातील पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. पाणीमापन यंत्रणेद्वारे वापरावर लक्ष ठेवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यासाठी हे आवर्तन महत्त्वाचे ठरणार असून आगामी काही दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









