जळगावातील तब्बल ‘इतक्या’ महिला ‘लाडकी बहीण’ योजनेतून कायमचे बाद?

जून 12, 2026 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत जळगाव जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अंतिम पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ३७ हजाराहून अधिक महिला अपात्र ठरल्याचा दावा केला जात आहेत स्थानिक प्रशासनाकडे मात्र कुठलीही आकडेवारी उपलब्ध नसल्याने अर्जदार महिलांची दुहेरी कोंडी झाली आहे.

ladki bahin

विशेष म्हणजे, अर्ज दुरुस्तीसाठी आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याने या अपात्र महिलांची योजनेत पुन्हा समाविष्ट होण्याची आशाही मावळली आहे.दुसरीकडे, राज्यभरातून या योजनेत चक्क १४ हजार पुरुषांनी डल्ला मारल्याचे उघड झाले असून, आता त्यांच्याकडून व्याजासह पैशांची वसुली केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीची अंतिम मुदत संपल्यानंतर राज्य पातळीवर मोठी उलथापालथ झाली आहे. राज्यभरातून तब्बल ८१ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या सुरुवातीला असलेला २ कोटी ४६ लाखांचा आकडा आता थेट १ कोटी ६५ लाखांवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातही सुरुवातीला १० लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली होती, परंतु कडक पडताळणीनंतर आता जिल्ह्यात केवळ सव्वापाच लाख महिलाच प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्र उरल्या आहेत.

या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ३७ हजार महिलांपैकी बहुतांश महिलांना योजनेच्या सुरुवातीपासून लाभ मिळत होता. या महिलांनी गेल्या १५ ते २० महिन्यांपासून दरमहा मिळणारे अनुदान नियमितपणे लाटले. शासकीय यंत्रणेची दिशाभूल करून घेतलेला हा पैसा आता या महिलांना महाग पडणार आहे.

कोणत्या निकषांवर ठरवले अपात्र?
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणे, अर्जदार महिलेच्या नावावर किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असण्यासह अन्य कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले आहे. पुरुष लाभार्थी आणि अपात्र ठरलेल्या महिलांकडून त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या सर्व हप्त्यांची रक्कम व्याजासह वसूल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now