जळगाव लाईव्ह न्यूज । प्रॉपर्टीच्या आणि घराच्या आर्थिक वादातून रक्ताचे नाते विसरून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातील जामनेर रोड परिसरात काल ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सख्ख्या भावाच्या शालकावर चाकूने सपासप वार करून त्याचा जीव घेण्यात आला. दीपक प्रकाश कानडे (वय ४० वर्षे, रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा) असं हत्या झालेल्या शालकाचे नाव असून खून केल्यानंतर मारेकरी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेने पाचोरा शहरात प्रचंड खळबळ उडाली

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील हिंद ऑईल मिलजवळ राहणारे संतोष हरलाल कानडे (वय ५५ वर्षे) आणि दीपक प्रकाश कानडे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दीपक कानडे हे संतोष कानडे यांच्या सख्ख्या भावाचे शालक होते. गेल्या काही काळापासून या दोघांमध्ये घराच्या आर्थिक व्यवहारावरून आणि प्रॉपर्टीवरून सतत शाब्दिक चकमक आणि वाद होत होते.

भररस्त्यात चाकूने भोसकले
८ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हा वाद पुन्हा विकोपाला गेला. शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ दोघे समोरासमोर आले असता त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान थेट हिंसेत झाले. संतापाच्या भरात संतोष कानडे याने आपल्याजवळील चाकू काढून दीपक कानडे यांच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्यामुळे दीपक कानडे यांचा जागीच मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच पळापळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मारेकरी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
दीपक कानडे यांचा खून केल्यानंतर आरोपी संतोष हरलाल कानडे याने पळून न जाता थेट पाचोरा पोलीस स्टेशन गाठले. त्याने पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपी संतोष कानडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कौटुंबिक आणि आर्थिक वादातून घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.












