जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव विधान परिषद निवडणुकीला वेग आला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून यामुळे जळगावात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना, बंडखोर रेश्मा काळे यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिकमधील राजकीय घडामोडींवर जळगावातील आपली बंडखोरी अवलंबून असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याबाबत बोलताना रेश्मा काळे म्हणाल्या, “खासदार श्रीकांत शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत, परंतु त्यांचा मला अद्याप कोणताही निरोप आलेला नाही. जर त्यांचा निरोप आला, तर नक्कीच आम्ही त्यांची भेट घेऊ.” पुढे बोलताना त्यांनी, “श्रीकांत शिंदे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा निर्णय मला मान्य राहील,” असे सांगत नेत्यांबद्दलचा आदरही व्यक्त केला.

तर रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी नाशिकमधील राजकीय समीकरणांची मोठी अट घातली आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, “नाशिकमध्ये गीते जर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असतील, तर आम्ही देखील इकडे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. मात्र, नाशिकमध्ये गीते यांनी जर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, तर मी जळगावात माझी उमेदवारी शंभर टक्के कायम ठेवेल.”
महायुतीची डोकेदुखी वाढणार?
रेश्मा काळे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता जळगाव आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय गणिते एकमेकांशी जोडली गेली आहेत. नाशिकमध्ये गीते काय निर्णय घेतात, यावर आता जळगावातील बंडखोरी शमणार की कायम राहणार, हे स्पष्ट होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रेश्मा काळे यांनी टाकलेल्या या अटीमुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.








