जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून भीषण उष्णतेचा तडाखा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत. यंदा मान्सून काहीसा लांबणीवर पडला असला, तरी पुढील २४ तासांत तो केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यात मान्सून कधी पोहोचणार, याची प्रतीक्षा आता संपली आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर १० जूनपर्यंत तो मुंबईत आणि १२ जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात दाखल होईल. जळगाव जिल्ह्याचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता साधारणपणे १० ते १४ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते, यंदाही तीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या पावसाळ्यावर ‘एल निनो’च्या स्थितीमुळे चिंतेचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार आहे. जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ६३२ मिमी पाऊस होतो. (गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच ६८१ मिमी पाऊस झाला होता.)
यंदा पाऊस कमी होणार असल्याने त्याचा थेट परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात साधारणपणे जून महिन्यात १२३ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनमध्ये केवळ १०० ते ११० मिमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जूनप्रमाणेच पुढील महिन्यांतही पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व कापूस लागवडीला वेग आला असला, तरी मुख्य खरीप पेरण्यांना १५ जूननंतरच गती मिळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे:
जोपर्यंत जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण होत नाही, म्हणजेच किमान ७५ ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कमी पावसात पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा.








