जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत लोणवाडी खुर्द येथील सरपंचांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, त्यावर चर्चा व मतदानासाठी सोमवार, ८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३५ (१) अंतर्गत हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत नोटीस जळगावच्या तहसीलदार शितल राजपूत यांनी १ जून रोजी जारी केली आहे.

तहसीलदार कार्यालयाकडून ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप भास्कर पवार यांच्यासह संबंधित सदस्यांना विशेष सभेची नोटीस बजावण्यात आली आहे. या सभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊन मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्व सदस्यांना अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावरही हालचालींना वेग आला आहे. मंडळाधिकारी (म्हासावद), ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी (लोणवाडी खुर्द) यांना नोटिसा संबंधितांपर्यंत विहित मुदतीत पोहोचवून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सरपंचांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने लोणवाडी खुर्दच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ८ जून रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








