गुन्हेधरणगाव

धरणगावात पामोलिन तेलापासून ‘कृत्रिम दूध’ बनवणाऱ्याचा पर्दाफाश ! एकास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२६ । पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार धरणगाव येथे उघडकीस आला आहे. रिफाइंड पामोलिन तेलापासून कृत्रिम दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिसळत विक्री करणाऱ्या भेसळखोराचा धरणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमनाथ माळी (वय ३२, रा. भवरखेडा) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली.

धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सोमनाथ माळी हा स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ माळी हा रिफाइंड पामोलिन तेलाचा वापर करून रासायनिक प्रक्रियेद्वारे हुबेहूब दुधासारखे दिसणारे कृत्रिम दूध तयार करत होता. हे घातक कृत्रिम दूध तो चांगल्या दुधात मिसळायचा, जेणेकरून दुधाचे प्रमाण वाढेल. हे भेसळयुक्त दूध अस्सल दूध म्हणूनच बाजारात विकले जात होते.

हे रासायनिक आणि कृत्रिम दूध मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. या दुधाच्या सेवनाने नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुसक्या आवळल्या.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, भेसळीच्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button