जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील श्रद्धेचे अनोखे केंद्र ठरलेल्या रिधूर येथील अवचित हनुमान मंदिराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लोण्यापासून साकारलेली स्वयंभू हनुमानाची मूर्ती आणि तिच्याशी जोडलेल्या चमत्कारिक कथा यामुळे हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही मूर्तीवरील लोणी वितळत नसल्याने भाविकांच्या श्रद्धेला अधिक बळ मिळत आहे.

तापी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर जळगाव शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असून मंदिराचा भव्य कळस आणि शांत परिसर भाविकांना आकर्षित करतो. पौर्णिमा आणि अमावस्येला येथे लोण्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. एका भक्ताने केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर लोणी अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आणि आज ती मंदिराची खास ओळख बनली आहे.

एका नवसाने सुरू झाली परंपरा
रिधुर येथील अवचित हनुमान मंदिरात मूळ स्वयंभू हनुमानाची मूर्ती आहे. अनेक वर्षांपूर्वी एका भक्ताने मानलेला नवस पूर्ण झाल्यानंतर, त्याने कृतज्ञता म्हणून मारुतीरायाला लोण्याचा नैवेद्य अर्पण केला होता. या घटनेनंतर मंदिराची ख्याती हळूहळू दूरवर पसरली. या अनोख्या परंपरेमुळे आज संपूर्ण हनुमानाची मूर्ती लोण्यानेच साकारली गेली आहे.
अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूच्या परिसरातील गुराखी त्यांची जनावरे परिसरात चारण्यासाठी येत आणि येथेच झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायचे. अशात एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला. जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम केले.
मात्र, गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र, काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. जमिनीतून हनुमानाची मूर्ती मिळून आल्यावर त्या स्वयंभू मूर्तीची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रगटलेल्या हनुमानाला ‘अवचित हनुमान’ संबोधले जाऊ लागले.
मंदिराची स्थापना झाल्यावर गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. त्यांनी त्यांच्या दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले. यानंतर हनुमानाचा चमत्कार म्हणावा की काय म्हणून त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले. यानंतर सदर व्यक्तीने लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाले. मात्र येताना त्यांना अंधार झाल्याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशाचे तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.







