खाकीतील माणुसकी! दिवंगत सहकाऱ्याच्या मुलीला जळगावच्या ‘एसपीं’चा मायेचा आधार! शैक्षणिक साहित्य भेट..

मे 22, 2026 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । कर्तव्य बजावत असताना निधन झालेले जळगाव पोलीस दलातील पोलीस अंमलदार स्व. भरत विठ्ठल कोळी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खाकी वर्दीतील संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. कोळी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला केवळ धीर न देता, त्यांच्या चिमुकल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी समजून तिला मदतीचा हात दिला आहे.

sp

स्व. भरत कोळी यांच्या निधनामुळे कोळी कुटुंब उघड्यावर आले असून, कुटुंबातील सदस्यांना या धक्क्यातून सावरणे कठीण झाले होते. अशा कठीण प्रसंगात जळगाव पोलीस दल आपल्या सहकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्व. कोळी यांची मुलगी चिमुकली अन्वी हिच्या पाठीवर मायेचा हात ठेवला आहे.

एसपी कार्यालयात बोलावून कौतुक

अन्वी ही नुकतीच इयत्ता दुसरीतून तिसरीच्या वर्गात गेली आहे. तिच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तिला थेट ‘एसपी’ (SP) कार्यालयात बोलावून घेतले. तिची आस्थेने विचारपूस करत तिला आणि तिच्या कुटुंबाला ‘आपण एकटे नसून संपूर्ण पोलीस दल आपल्या पाठीशी आहे’ असा विश्वास दिला.

शैक्षणिक साहित्याचे वाटप

नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने अन्वीला अभ्यासासाठी लागणाऱ्या शालेय वस्तू आणि संपूर्ण शैक्षणिक साहित्य पोलीस अधीक्षकांच्या हस्ते भेट देण्यात आले. ही मदत केवळ वस्तूंची नसून एका अनाथ झालेल्या कुटुंबाला मिळालेली मायेची ऊब ठरली आहे. कठीण प्रसंगात आपल्या दिवंगत सहकाऱ्याच्या मुलांची अशी काळजी घेण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र वाखाणले जात आहे.

याप्रसंगी स्व. भरत विठ्ठल कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच चिमुकल्या अन्वीला तिच्या पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी पोलीस दलातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now