जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२६ । यंदाच्या मे महिन्यातील कडक उन्हाने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला होरपळून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावचा पारा चक्क ४३ ते ४५ अंश सेल्सिअसवर राहिल्याने जळगावकर उन्हाच्या तीव्र लाटेचा सामना करत आहेत. अशातच, मंगळवारी जळगाव शहर आणि जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये पावसाच्या आगमनाची चर्चा रंगू लागली आहे.

ऐन उन्हाळ्यात हवामानात झालेल्या या बदलामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला, तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या जिल्ह्यात मोठ्या किंवा व्यापक पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, तरीही तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअस एवढा नोंदवला गेला. जळगावकर आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या निर्माण झालेली ढगाळ प्रणाली मुख्यतः किनारपट्टीच्या भागात जास्त सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किंवा जळगाव जिल्ह्यात सलग आणि सर्वदूर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सध्यातरी नाही. परंतु, स्थानिक हवामानातील बदलांमुळे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस किंवा तुरळक सरी कोसळू शकतात.
ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर येत नसल्याने जळगावकरांना उन्हाच्या थेट तीव्र चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. तापमान थोडे कमी वाटले, तरी उष्ण व दमट हवामानामुळे अंगाची लाहीलाही होणार आहे.







