गुडन्यूज! १६ मे पर्यंत मान्सून अंदमानात धडकण्याची शक्यता; जळगावात कधी पोहोचणार? अधिकृत तारखा आल्या समोर

मे 14, 2026 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देश कडाक्याच्या उन्हात होरपळत आहे. जळगावसह अनेक जिल्ह्यांचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, या प्रचंड उकाड्यात भारतीय हवामान खात्याने (IMD) एक मोठी ‘गुडन्यूज’ दिली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर आणि लवकर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

monsoon jpg webp

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून शनिवार, १६ मे २०२६ पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग आणि अंदमान समुद्रामध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

अंदमानात १६ मे रोजी एन्ट्री केल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास सुरु होऊन तो केरळमध्ये ३ ते ५ जून दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तविली आहे. यानंतर तळकोकणात ७ ते ९ जून आणि मुंबई, पुण्यात येण्यास १२ ते १४ जून उजाडणार आहे.

जळगाव जिल्ह्यात कधी पोहोचेल मान्सून?

जळगाव जिल्ह्यात साधारणपणे मान्सून १० ते १५ जूनदरम्यान पोहोचतो. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये ३ ते ५ जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्र मार्गे पुढे सरकणार असल्याने जळगावमध्ये १२ ते १५ जूनदरम्यान मान्सून आगमनाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात २० मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. सध्या तापमान वाढीचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या उष्णतेने जळगावकर अक्षरक्ष: होरपळून निघत आहे. यामुळे जळगावकर देखील मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या हालचालींमध्ये बदल होत असून, यंदा तो लवकर येण्याचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रातही वेळेवर पाऊस सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र, वाऱ्यांची स्थिती आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदलांवर अंतिम आगमन अवलंबून असणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now