जळगाव लाईव्ह न्यूज । पुण्याला रेल्वेनं प्रवास करणाऱ्या जळगाव-भुसावळच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे रेल्वे विभागातील अकोलनेर, अहिल्यानगर आणि निंबलक स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ ते १९ मे दरम्यान तब्बल ५ दिवसांचा मोठा ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ जाहीर केला आहे. या मेगा ब्लॉकमुळे ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या गर्दीत भुसावळ, जळगाव मार्गे धावणाऱ्या पुणे-नागपूर गरीबरथ, पुणे-गोरखपूर एक्सप्रेससह एकूण १२ महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर १८ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. हजारो प्रवाशांनी महिन्याभरापूर्वीच तिकीट आरक्षित (Reservation) करून प्रवासाचे नियोजन केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने या महाब्लॉकची माहिती ऐन वेळेवर, म्हणजे केवळ ३ दिवस आधी दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अनेकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

या १२ प्रमुख गाड्या पूर्णपणे रद्द (१४ ते १९ मे)
पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस (१२११३/१४)
पुणे-नागपूर एक्सप्रेस (१२१३५/३६): (१६ व १७ मे)
पुणे-नागपूर-पुणे एक्सप्रेस (१५ ते १८ मे)
पुणे-गोरखपूर-हडपसर विशेष (०१४१५/१६): (१४ ते १९ मे)
पुणे-दानापूर विशेष (०१४४९/५०): (१६ व १७ मे)
पुणे-जबलपूर विशेष (०२१३१/३२): (१७ व १८ मे)
हडपसर-झांशी विशेष (०१९२३/२४): (१६ व १७ मे)
१८ गाड्या लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार
नियमित मार्ग बंद असल्याने १८ महत्त्वाच्या गाड्या मराठवाड्यातील विविध शहरांमधून वळवण्यात आल्या आहेत:
लातूर, परभणी मार्गे वळवलेल्या गाड्या: हडपसर-हजूर साहेब नांदेड एक्सप्रेस आणि पुणे-अमरावती एक्सप्रेस या गाड्या आता त्यांच्या नियमित मार्गाऐवजी दौंड, कुडुवाडी, लातूर रोड, परभणी आणि पूर्णा मार्गे धावतील.
छत्रपती संभाजीनगर, मनमाड मार्गे वळवलेल्या गाड्या: हुबळी-बनारस, केएसआर बंगळुरू-नवी दिल्ली आणि हुबळी-हजरत निजामुद्दीन या अतिशय महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता सोलापूर, लातूर रोड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि मनमाड मार्गे धावतील.
या ब्लॉकमुळे वळवलेल्या गाड्यांच्या वेळेत आणि स्थानकांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत हेल्पलाईनवर किंवा ‘NTES’ ॲपवर आपल्या गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.







