जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२६ । गिरणा नदी पात्रातून बैलगाडीने जात असताना झालेल्या अपघातात एका कष्टकरी शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५, रा.वडनगरी) असं मृत शेतकऱ्याच नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्यानं मोठं मोठी खड्डे पडले आहेत. यातच वडनगरी येथील रहिवासी असलेले दिलीप कल्याणकर आणि त्यांचे सहकारी चिंतामण नाईक हे दोघे दररोजप्रमाणे सरपंच दत्तू रामचंद्र पाटील यांच्या खेडी भोकर शिवारातील शेतात मजुरीसाठी जात होते. आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदीच्या पात्रातून जात असताना एका खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक बैलगाडी उलटली.

संकटाची चाहूल लागताच चिंतामण नाईक यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला.मात्र, दिलीप कल्याणकर यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. ते खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवून शोध मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. या दुदैवी घटनेत एक बैल बचावला तर दुसरा बैल देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








