रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर मध्यरात्री नशिराबादच्या पोलिसांनी स्वतः टाकली माती, जीवघेणा अनर्थ टाळला

एप्रिल 25, 2026 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पोलीस म्हणजे केवळ गुन्हेगारांचा बंदोबस्त करणारे नव्हे, तर संकटाच्या वेळी देवदूतासारखे धावून येणारे रक्षक असतात, याचा प्रत्यय जळगाव बायपासवर आला. तरसोद फाट्याजवळ मध्यरात्री रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता नारखेडे आणि त्यांच्या पथकाने स्वतः रस्त्यावर माती टाकून संभाव्य जीवघेणा अनर्थ टाळला.

nsd 1

नेमकी घटना काय?

जळगाव बायपासवरील तरसोद फाट्याजवळ रात्री ११:४५ च्या सुमारास एक जेसीबी बिघाड झाल्यामुळे बंद पडला होता. या नादुरुस्त जेसीबीमधून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती होऊन ते मुख्य रस्त्यावर पसरले. बायपास रस्ता असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो, त्यातच रात्रीच्या अंधारामुळे ऑईलचा अंदाज न आल्याने २ ते ३ दुचाकीस्वार घसरून पडले.

रस्त्यावर वाहने घसरत असल्याची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्टेशनच्या एपीआय योगिता नारखेडे यांनी आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, इतर कोणत्याही यंत्रणेची किंवा मजुरांची वाट न पाहता एपीआय योगिता नारखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील ऑईलवर माती टाकण्यास सुरुवात केली.

केवळ माती टाकून पोलीस थांबले नाहीत, तर तो नादुरुस्त जेसीबी सुरक्षितरीत्या रस्त्याच्या बाजूला करेपर्यंत संपूर्ण टीम तिथेच तैनात होती. रात्री साडेअकरापासून सुरू झालेले हे मदतकार्य पहाटे २ वाजेपर्यंत सुरू होते. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्याची खात्री पटल्यानंतरच पोलीस पथक माघारी फिरले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now