वीज चोरी भोवली! आरोपीला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत कारावास अन् दंडाची शिक्षा

एप्रिल 24, 2026 11:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाणी शुद्धीकरण केंद्र आणि पिठाची गिरणी चालवण्यासाठी वीज चोरी करणाऱ्या वडगाव बुद्रुक येथील एका आरोपीला न्यायालयाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत कडक शिक्षा सुनावली आहे. कोमलसिंग हरिसिंग पाटील असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने एका गुन्ह्यात सहा महिने कारावास, तर दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालय उठेपर्यंत शिक्षा आणि दोन्ही गुन्ह्यांत मिळून ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईने वीज चोरांमध्ये खळबळ उडाली

vij chor mahavitarn

पहिली घटना २२ सप्टेंबर २०१९ पूर्वी घडली होती. आरोपी कोमलसिंग पाटील याने महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर थेट आकडा टाकून ६,५४० युनिटची वीज चोरी केली होती. या चोरीची एकूण किंमत १ लाख ३५ हजार ५९१ रुपये इतकी होती. महावितरणचे सहाय्यक अभियंता गौतम मोरे यांनी याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्यात तदर्थ न्यायालय क्र. २ चे अति. सत्र न्यायाधीश बडे यांनी ५ साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीला भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार दोषी ठरवत न्यायालय उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंड सुनावला.

दुसऱ्यांदा गुन्हा केल्याने कारावासाची शिक्षा

पहिल्या गुन्ह्यानंतर वर्षभरातच आरोपीने पुन्हा वीज चोरी केली. १२ डिसेंबर २०२० रोजी पिठाच्या गिरणीसाठी ३,५६४ युनिटची (किंमत २१,८८१ रुपये) वीज चोरी केल्याचे उघड झाले. हा गुन्हा दुसऱ्यांदा केल्यामुळे आरोपीला कोणत्याही प्रकारचे तडजोड बिल देण्यात आले नव्हते. या दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने अधिक कठोर भूमिका घेत आरोपीला सहा महिने साधा कारावास आणि २१ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वैशाली महाजन यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांच्या जबानी आणि महावितरणने सादर केलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हे निकाल दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now