गुड न्यूज! भुसावळमार्गे पुण्यासाठी नवीन ‘अमृत भारत’ एक्सप्रेस धावणार, ‘ही’ विशेष ट्रेनही झाली नियमित

एप्रिल 21, 2026 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळमार्गे पुण्याला जाणाऱ्या आणि उत्तर भारतातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेने आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ‘पुणे-बनारस अमृत भारत एक्सप्रेस’ (Pune-Banaras Amrit Bharat Express) येत्या २४ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत, आतापर्यंत विशेष रेल्वे म्हणून धावणारी ‘पुणे-जबलपूर एक्सप्रेस’ आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे.

pune banaras amrit bharat

या दोन्ही एक्सप्रेस गाड्या भुसावळ जंक्शनवरून धावणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः पुणे येथे शिक्षण आणि नोकरीनिमित्त राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना आता प्रवासासाठी दोन हक्काचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

२४ एप्रिलपासून ‘अमृत भारत’चा श्रीगणेशा

‘अमृत भारत एक्सप्रेस’ ही पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन असून, २४ एप्रिलपासून ती पुणे आणि बनारस दरम्यान आपली नियमित सेवा सुरू करेल. ही ट्रेन हडपसर टर्मिनलहून सुटणार असून, त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. ही गाडी भुसावळमार्गे जाणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.

या ट्रेनमध्ये स्लीपर आणि जनरल क्लासच्या डब्यांसह एकूण २२ डबे असतील. हडपसर-बनारस अमृत भारत एक्सप्रेसचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि बुकिंगच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. लवकरच रेल्वेकडून याची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. या गाडीला हडपसर (पुणे), दौंड , मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी जंक्शन, प्रयागराज जंक्शन आणि बनारस (वाराणसी) या स्थानकावर गाडी थांबण्याची शक्यता आहे.

पुणे-जबलपूर ट्रेन आता नियमित

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पुणे-जबलपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवली जात होती. मात्र, प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही गाडी आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-जबलपूर विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी २०१९१/२०१९२ या नवीन क्रमांकाने पुणे-जबलपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून याला मान्यता देण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now