यावलच्या गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयकडून होणारी लूट थांबेना ! ग्राहकांमध्ये संताप

एप्रिल 21, 2026 1:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शहरातील चंदन गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयकडून सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबण्याचं नाव घेत नाहीय. गॅस सिलिंडरची घरपोच सेवा देताना ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे वसूल केले जात असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

gas 1

‘सर्व्हिस चार्ज’च्या नावाखाली लूट

मिळालेल्या माहितीनुसार, भारत गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी येणारे डिलिव्हरी बॉय प्रत्येक ग्राहकाकडून नियम नसतानाही २० ते २५ रुपये अधिकचे मागत आहेत. जेव्हा ग्राहक या वाढीव पैशांबाबत विचारणा करतात, तेव्हा “हा सर्व्हिस चार्ज आहे,” असे उत्तर दिले जाते. मात्र, धक्कादायक बाब अशी की, या वसूल केलेल्या जादा पैशांची कोणतीही अधिकृत पावती ग्राहकांना दिली जात नाही. प्रत्यक्षात गॅसच्या मूळ किमतीत घरपोच वितरणाचे शुल्क अंतर्भूत असतानाही, ही बेकायदेशीर वसुली गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास सुरू आहे.

पैसे न दिल्यास सिलिंडर परत नेण्याची धमकी

कमी उत्पन्न असलेल्या आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना या जाचाचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे. काही जागृत ग्राहकांनी वाढीव पैसे देण्यास नकार दिला असता, डिलिव्हरी बॉयकडून त्यांना चक्क “पैसे देणार नसाल तर सिलिंडर परत घेऊन जाऊ” अशी धमकी दिली जात असल्याचे समजते. ग्राहकांना गॅसची नितांत गरज असल्याने नाइलाजास्तव त्यांना हे जादा पैसे मोजावे लागत आहेत.

एजन्सीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

एकीकडे गॅसच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयकडून होणारी ही लूट थांबवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत एजन्सी मालकाकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, “ही लूट मालकाच्या संमतीनेच सुरू आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ग्राहकांकडून आता प्रशासनाने या लुटीची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now