Chalisagaon : शिकारीच्या नादात विहिरीत पडला, रात्रभर पाईपला धरून मृत्यूला रोखले..अखेर बिबट्याची रेस्क्यूने सुखरूप सुटका

एप्रिल 17, 2026 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असतानाच, चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात एक थरारक घटना समोर आली. भक्षाचा पाठलाग करताना एक बिबट्या शेतातील विहिरीत कोसळला. मात्र, वनविभागाने दाखवलेली तत्परता आणि ग्रामस्थांच्या मदतीने राबवलेल्या अनोख्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मुळे या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

bibtyacls

नेमकी घटना काय?

पाटणादेवी जंगलापासून जवळच असलेल्या शिवापूर (ता. चाळीसगाव) येथील अशोक नामदेव राजपूत यांच्या मालकीच्या गट क्रमांक १३७/२ या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्याचा अंदाज चुकला आणि तो थेट विहिरीत कोसळला. विहीर खोल असल्याने आणि बाहेर पडायला मार्ग नसल्याने बिबट्याने विहिरीत असलेल्या पाईपचा आधार घेतला. रात्रभर हा बिबट्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या पाईपला धरून पाण्यावर तरंगत राहिला होता.

विहिरीत बिबट्या असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शिवापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांनी तातडीने वन विभाग आणि पोलिसांना पाचारण केले.

वन विभागाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. एका मजबूत दोराला खाट बांधून ती विहिरीत बिबट्याजवळ सोडण्यात आली. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या बिबट्यानेही क्षणाचाही विलंब न लावता त्या खाटेवर झेप घेतली. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने ही खाट वर खेचून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले.

बिबट्या सुखरूप बाहेर निघाल्यानंतर त्याला वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली. बिबट्याला सुखरूप बाहेर काढल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now