जळगावातील महामार्गालगतच्या अतिक्रमणावर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ ; अजिंठा चौफुलीजवळील अतिक्रमणे जमीनदोस्त

एप्रिल 16, 2026 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२६ । जळगाव शहरातील महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने आज आक्रमक पाऊल उचलत मोठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्तात अजिंठा चौफुली ते भंगार बाजार परिसरामधील अतिक्रमणावर हातोडा चालविला. या कारवाईमुळे महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

jlc atikraman

मोहिमेची सुरुवात अजिंठा चौफुलीजवळील कब्रस्थान परिसरापासून झाली. कारवाईच्या सुरुवातीलाच एका कारवर जप्तीची कारवाई करताना संबंधित मालकांनी कडाडून विरोध केल्याने तणावाचे प्रसंग ओढवले. मात्र, तैनात असलेल्या पोलीस ताफ्याने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा भंगार बाजार आणि अजिंठा चौफुलीच्या सर्व्हिस रोडकडे वळवला.

येथे सर्व्हिस रोडवर उभारलेल्या टपऱ्या, गॅरेजसमोरील साहित्य आणि भंगाराचा मोठा ढिगारा हटवण्यात आला.या मोहिमेदरम्यान प्रशासनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भंगार बाजारातील काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, काही लोटगाडी चालक आणि गॅरेज मालकांनी
“आम्ही स्वतःहून गाड्या हटवत आहोत, त्या जप्त करू नका,” अशी विनंती करत असताना मनपा कर्मचाऱ्यांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली.

कारवाईदरम्यान काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला. या मोहिमेचा फटका केवळ अतिक्रमणधारकांनाच नाही, तर बँक कर्मचारी आणि ग्राहकांनाही बसला. सर्व्हिस रोडवर शिस्तीत लावलेल्या दुचाकींवरही क्रेनने कारवाई करण्यात आली.

प्रशासनाचा ‘अल्टिमेटम’:
“NHAI च्या सूचनेनुसार महामार्ग मोकळा करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. ही केवळ सुरुवात असून इथून पुढेही ही कारवाई सातत्याने सुरू राहील. ज्यांनी अद्याप अतिक्रमणे हटवलेली नाहीत, त्यांनी त्वरित ती काढून घ्यावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.” असा इशारा महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now