शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारा घोटाळा; जळगावातील ४८ अधिकाऱ्यांना एसआयटीकडून चौकशीचे समन्स..

एप्रिल 15, 2026 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह नाशिक विभागात शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पगार लाटल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी एसआयटीने जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तब्बल ४८ जणांना चौकशीसाठी नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

teacher bharti jpg webp

नेमके प्रकरण काय?

नाशिक विभागातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीमध्ये २०१३ ते २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तपासात असे समोर आले की, काही शाळांनी कोणतीही अधिकृत पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासकीय यंत्रणेशी हातमिळवणी करून तब्बल ८९२ कर्मचाऱ्यांच्या आयडीमध्ये अनियमितता आढळून आली आहे, ज्यापैकी ६०० हून अधिक आयडी पूर्णपणे बनावट असल्याचे बोलले जात आहे.

बड्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी

ऑक्टोबर २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावमधील १० शाळांची झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या तपासाच्या आधारे एसआयटीने आता तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एसआयटीने नोटीस बजावलेल्या यादीत ११ तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यासह ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहायक २३ अशा एकूण ४८ जणांची चौकशी केली जाणार आहे.

या सर्व ४८ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना १५ ते १८ एप्रिल या कालावधीत नाशिक विभागीय मंडळात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सलग चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीत बनावट आयडी कशाच्या आधारे मंजूर करण्यात आले आणि यामागे कोणाचे मुख्य सूत्रधार आहेत, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. हा घोटाळा उघड झाल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत. तपासाअंती यातील गुन्हेगारांवर कठोर फौजदारी कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now