६८ वर्षीय वृद्धाला शस्त्रसाठ्यासह रंगेहाथ पकडले ; भुसावळ तालुक्यात खळबळ

एप्रिल 13, 2026 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा शिवारात वरणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत एका ६८ वर्षीय वृद्धाला शस्त्रसाठ्यासह रंगेहाथ पकडले. या कारवाईत २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि एक धारदार तलवार असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

crime 2 jpg webp

पोलिसांना काहुरखेडा शिवारातील मानपूर रोडवरील सोलर प्लांटजवळ, तलावाकाठच्या शंकर मंदिर परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

या कारवाईदरम्यान संशयित अशांक जगन्नाथ कोळी (वय ६८, रा. मांगलवाडी, ता. रावेर, ह.मु. काहुरखेडा) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा राखाडी रंगाचा गावठी कट्टा सापडला. विशेष म्हणजे त्या कट्ट्यावर इंग्रजीत ‘MAID IN SPIAN’ असे लिहिलेले आढळले.

याशिवाय ४० हजार रुपयांचा आणखी एक काळा कट्टा, ८ हजार रुपयांची ४ जिवंत काडतुसे आणि ५ हजार रुपये किमतीची ३२ इंची पोलादी तलवार जप्त करण्यात आली.

ही कारवाई वरणगाव पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार यासिन पिजारी आणि सपोनि अमितकुमार बागुल यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now