जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या अनेक दिवसांपासून आखाती देशातील युद्धामुळे होरपळणाऱ्या खाद्यतेलाच्या बाजारपेठेत आता सुखावह बदल पाहायला मिळत आहे. इराणने युद्धविरामाची घोषणा केल्याने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेचा दबाव कमी झाल्याने जागतिक बाजारपेठ स्थिरावली आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत दिसून आला असून, खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो ७ ते १० रुपयांची घट झाली आहे. मात्र ही स्थिती कायम राहणार नसून, पुन्हा दरवाढीची शक्यता व्यापाऱ्याकडून वर्तवण्यात आली आहे.

केवळ खाद्यतेलच नव्हे, तर पेट्रोलियम पदार्थांवर आधारित असलेल्या प्लास्टिक वस्तू आणि पॉलिथिनच्या वाढत्या किमतींनाही आता ब्रेक लागला आहे. शेंगदाण्याची आवक सुधारल्याने आणि युद्धाची भीती कमी झाल्याने शेंगदाणा तेलाच्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे.

सध्या जरी दरात घट झाली असली तरी, ही स्थिती कायम राहणार नसल्याचे संकेत स्थानिक व्यापाऱ्यांनी दिले आहेत. जागतिक घडामोडी आणि पुरवठा साखळीतील बदलांमुळे भविष्यात पुन्हा दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची ही दरवाढ कमी होणे, जळगावकरांसाठी तात्पुरता पण मोठा दिलासा मानला जात आहे.
खाद्य तेलाचे दर (लिटरमध्ये)
तेलाचा प्रकार….१५ दिवसांपूर्वी – आता
शेंगदाणा तेल : २२५ २१५
सूर्यफूल तेल : १८५ १७५
राइस ब्रॅन : १७५ १६५
पाम तेल : १७० १६३
सोयाबीन तेल : १६५ १५८








