जळगावकरांनो काळजी घ्या ! अवघ्या ४८ तासांत तापमानात ५ अंशांची वाढ, पारा आणखी वाढणार

एप्रिल 12, 2026 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२६ । एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच जळगाव जिल्ह्याने आपले ‘हॉट’ शहर असल्याचे रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत जळगावच्या तापमानात तब्बल ५ अंशांहून अधिक वाढ झाली असून, जिल्ह्याचा पारा आता ४१ अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी जळगावच्या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

tapman 2

या आठवड्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता तुलनेने कमी होती. गुरुवारी जळगावचे तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र, अवघ्या ४८ तासांत तापमानात मोठी वाढ होऊन शनिवारी हा आकडा ४१ अंशांवर जाऊन ठेपला आहे. कोरड्या हवेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत.

सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारी १ ते ४ या वेळेत मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, उसाचा रस आणि शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत.

दरम्यान, केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या तापमानातही वाढ होताना दिसत आहे. ९ आणि १० एप्रिल रोजी किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस होते, जे आज ११ एप्रिल रोजी २१.५ अंशांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जळगावकरांना अधिक तीव्र उन्हाचा सामना करावा लागू शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now